बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये नुकतेच नेहरू नगर पीजीमध्ये आत्महत्या केलेल्या ऐश्वर्या लक्ष्मी प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. व्हॉटस्ॲप मेसेजच्या आधारे तिचा प्रियकर आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेहरूनगरमधील पी.जी. मध्ये आत्महत्या केलेल्या विजयपूर येथील एमबीए पदवीधर ऐश्वर्या लक्ष्मी प्रकरणात तिच्या प्रियकराला आम्ही शनिवारी अटक केली आहे. तपासादरम्यान, ऐश्वर्या लक्ष्मीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या प्रियकराला शेवटचा संदेश पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी पी.जी. मध्ये येऊन गेल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. घटनेनंतर आरोपी कोल्हापूरला फरार झाला होता. आमच्या विशेष पथकाने शोधमोहीम राबवून शनिवारी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.