- बीएसएफ जवानासह दोघांचा मृत्यू
- ट्रकची दुचाकी,रुग्णवाहिका व बसला धडक बसून अपघात
विजयपूर / दिपक शिंत्रे
गुजरातहून अतिवेगाने आणि बेंगळूरूच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक (जिजे 06 – एयू 5073) या ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या साखळी अपघातात सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान जागीच ठार झाला. तर त्याच ट्रकची आणखी एका रुग्णवाहिकेला धडक बसल्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. निडगुंदी शहरातील बसस्थानकाच्या समोर बुधवारी ही घटना घडली. मौनेश खुबप्पा राठोड (वय ३५ ; रा. कालगीतांडा, जि. बागलकोट) असे मृत बीएसएफ जवानाचे तर रितेशकुमार (वय ५०) असे मृत रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार मृत जवान मौनेश राठोड हे कालगी तांडाहून निडगुंदीमार्गे बागलकोट जिल्ह्यातील आलूर तांड्याला पत्नी निर्मला हिस भेटून परत सैन्यात रुजू होण्यासाठी जात होते. यावेळी निडगुंदी बस स्थानकासमोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला.
याच ट्रकने पुढे ताळिकोटे – वास्को बस व उत्तरप्रदेश मधील (यूपी ८३ एटी – ८१०८) क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाही धडक दिली. पण सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या धडकेत रुग्णवाहिकेचा चालक रितेशकुमार (वय ५०) यांचा मृत्यू झाला. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शकांनी सांगितले.
दरम्यान अपघातनंतर निडगुंदी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. या घटनेची निडगुंदी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.