- कॅम्प पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या जानेवारी महिन्यात सरस्वतीनगर, गणेशपुर येथे झालेल्या घरफोडीचा छडा लावताना कॅम्प पोलिसांनी दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक केली. वखार अहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला (दोघे राहणार मध्यप्रदेश)अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ११ लाख ८३ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सरस्वतीनगर गणेशपूर येथील अँथोनी डिक्क्रुझ हे आपल्या पत्नी समवेत गेल्या १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजस्थान येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १७ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना १ फेब्रुवारी २०२५ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंद होऊन चोरीचा छडा लावण्यासाठी तपास कार्य हाती घेण्यात आले होते.
शहर पोलीस आयुक्त ईडा मार्टिन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे व रहदारी विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजनराज अरस. खडेबाजार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच., कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ एम. यांच्या नेतृत्वाखाली उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी, सीएचसी बसवराज उज्जैनकोप्प, सीपीसी जे.एस.लमानी, एन. एम. तेली, एच. वाय. विभूती, संतोष बी. बरगी. एम. एस. लमानी आणि आर. एस. अक्की या पथकाने नुकताच या घरफोडीचा छडा लावला. या पोलीस पथकाने मध्यप्रदेशातील वखार अहमद अन्वर शेख आणि शुभम भगवानसिंग मुभाला या दोघांना गजाआड करून त्यांच्या जवळील ११ लाख ८३ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.