- वास्को – द – गामा यशवंतपुर गाडीचा डबा रुळावरून घसरला
बेळगाव / प्रतिनिधी
कॅसलरॉक नजीक प्रवासी रेल्वेचा डबा रेल्वे ट्रॅक वरून घसरल्याने कॅसरलॉक दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवर किरकोळ परिणाम झाला आहे. रविवारी पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान वास्को – द- गामा यशवंतपुर रेल्वे गाडीचा डबा रेल्वे रुळावर घसरल्याने अपघात झाला आहे. करंजोल आणि कॅसलरॉक दरम्यान अंदाजे ०२:३० वाजता ट्रेन क्रमांक १७३१० (वास्को – द – गामा – यशवंतपूर) चा एक डबा रुळावरून घसरला. या अपघातात कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नसल्याचे रेल्वे कडून कळवण्यात आले आहे.
मात्र, या घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. वास्को-द-गामा ते शालीमार जाणारी ट्रेन (क्रमांक 18048), जी सकाळी ६.३० वाजता सुटणार होती, ती आता दोन तास उशीराने ८.३० वाजता सुटेल.
हजरत निजामुद्दीन ते वास्को-द-गामा ही ट्रेन (क्रमांक १२७८०) सध्या लोंडा स्टेशनवर थांबलेली आहे. लोंडा येथे सुमारे १,००० प्रवाशांसाठी नाश्ता, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अपघातग्रस्त डबा हटवण्यासाठी वास्को-द-गामा येथून विशेष ट्रेन घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुळ दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू असून, आणखी कोणतेही बदल झाल्यास प्रवाशांना त्वरित माहिती देण्यात येईल.