• गोकाक येथील घटना

गोकाक / वार्ताहर

संततधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून तिची चार वर्षांची बहीण जखमी झाली आहे. गोकाक शहरातील महालिंगेश्वर कॉलनीमध्ये गोकाक शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. कीर्तिका नागेश पुजारी (वय ३ वर्षे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. घराच्या मागील बाजूची भिंत कोसळून ती कीर्तिकाच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेल्या चार वर्षांच्या बहिणीलाही दुखापत झाली असून, तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, कार्तिका आणि तिची मोठी बहीण एकाच खोलीत झोपल्या होत्या, तर त्यांचे आई – वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. पहाटेच्या सुमारास घराच्या एका भागाची भिंत कोसळली. या घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. कीर्तिकाचा मृतदेह गोकाक सरकारी रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.