कित्तूर / वार्ताहर

कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसनजीक रविवारी दुपारी टँकरची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात तीन कामगार जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रामचंद्र महेश आणि रामण्णा अशी मृतांची नावे असून ते सर्वजण कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हे तिघेही कामगार महामार्गावर दुरुस्तीचे काम करत होते. या घटनेत भीमाबाई, लक्ष्मीबाई आणि अनुश्री या तिन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त टॅंकर नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून थेट सर्विस रोडवर कोसळला आणि त्याने कामगारांना धडक दिली. या अपघातात टॅंकर चालक ही गंभीर जखमी झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातानंतर कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी करून तपास सुरू केला आहे.