छत्तीसगड : दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण धडकेत १३ जणांचा म़त्यू झाल्याची घटना घडली. यात एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. रायपूर जिल्ह्यातील रायपूर बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ रविवारी रात्री उशीरा झालेल्या या अपघातात चार मुले व ९ महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्यात आले व जखमींना रायपूरच्या डॉ भीमराव आंबेडकर रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. या अपघातात साधारण १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघातानंतर पंचनामा करत म़तदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.