बेळगाव / प्रतिनिधी

थायलंड पटाया येथे नुकत्याच झालेल्या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगांवचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू विनोद मंत्री यांचे सुर्वणपदक व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून उत्तीर्ण झालेल्या राजेश लोहार यांचा व बेळगावच्या विविध संघटनेच्या वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.

धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्या समोर जंगी स्वागत करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुणे कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना व अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय सुंठकर, श्री रामसेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय नेते रमाकांत कोंडुसकर, दलीत नेते मल्लेश चौगुले, अनिल अमरोळी, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, मराठा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पवार, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, नारायण चौगुले, प्रविण कणबरकर, जितेंद्र काकतीकर, प्रेमनाथ नाईक, गणेश दड्डीकर, आकाश हलगेकर, विनोदची आई सुमन मेत्री, पत्नी गिरीजा मंत्री या मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.  याप्रसंगी अनिल अमरोळी यांनी खेळाडूंच्या कार्याची माहिती दिली. तसेच संघटनेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर पाहुण्यांचे हस्ते विनोद व राजेश यांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. उपस्थित क्रिडाशौकिनाना मिठाई वाटण्यात आली.

यानंतर खुल्या जीपमधून विनोद व राजेश यांची शहराच्या विविध भागात रॅली काढण्यात आली. वीरराणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री उभा मारूती पुतळा श्री बसवेश्वर महाराज पुतळा, श्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अनगोळ येथील श्री धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विविध ठिकाणी बेळगांवकर प्रेक्षकांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत व अभिनंदन केले. यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व स्पोर्ट्स, अस्मिता क्रिएशन ग्रुपचे पदाधिकारी, एसएसएस स्पोर्टस फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी व बेळगांवातील विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.