विजयपूर / दिपक शिंत्रे

“मनुष्याला तणावमुक्त करून उत्तम व्यक्तिमत्त्व घडवण्यात क्रीडांचा महत्त्वाचा वाटा आहे,” असे मत युवा भारत समितीचे संस्थापक व समाजसेवक उमेश कारजोळ यांनी व्यक्त केले.विजयपूर शहरातील जिल्हा इनडोअर स्टेडियममध्ये सखी युवा महिला सेवा संस्था आणि युवा भारत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

क्रीडा ही केवळ मनोरंजनासाठी नसून, ती शारीरिक आणि मानसिक आरोग्य वृद्धिंगत करते, एकाग्रता वाढवते आणि बंधुभाव वाढवण्याचे काम करते. क्रीडांना ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी आहे. क्रीडांबद्दलची आवड प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या खेळाचा चाहता असतो हे नक्की,” असे त्यांनी सांगितले.

इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या क्रीडांमधून भरपूर फायदे होतात. खेळाडूंनी खेळाची स्पर्धा क्रीडामनोनभावाने स्वीकारावी. पराभव आणि विजय दोन्ही गोष्टी समानतेने स्वीकारायला हव्यात. पराभवातून हताश न होता, त्या अनुभवातून शिकून पुढे विजय मिळवायचा प्रयत्न करावा. क्रीडानियमांचे पालन करणे हे खेळाडूंचे प्राथमिक कर्तव्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले. विविध संस्था अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा प्रतिभांना संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत, ही स्तुत्य बाब आहे,” असे त्यांनी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा युवा परिषद अध्यक्ष शरणू सबरद, सी. पी. आय. शरणगौड गौडर, गीता पाटील, पूजा बागी, अखिल शीलवंत, सतीश बागी, महेश बागी, विनोदकुमार मणूर उपस्थित होते.