- किरकोळ वादातून घडला प्रकार
बैलहोंगल / वार्ताहर
किरकोळ वादातून एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. बैलहोंगल नजीक सुतगट्टी गावात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. व्यंकटेश सुरेश दलवाई (वय १८ वर्षे रा. सुतगट्टी ता. बैलहोंगल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर बसवराज सोमिलिंगप्पा पेंटेड (वय २० वर्षे) आणि त्याचा भाऊ राघवेंद्र पेंटेड दोघेही (रा. सुतगट्टी ता. बैलहोंगल) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत प्राप्त माहितीनुसार वेंकटेश आणि बसवराज या दोघांमध्ये काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. या कारणास्तव गावातील हुली अज्जना मठाच्या आवारात झालेल्या भांडणाचे पर्यावसान हत्येमध्ये झाले.
या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेंकटेशला तातडीने सौंदत्ती येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सौंदत्ती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.