• भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर परतणार

न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर यांना घेऊन एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे स्पेसक्राफ्ट ड्रॅगनचा पृथ्वीकडे प्रवास सुरु झाला आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रापासून स्पेसक्राफ्ट अनडॉक झाले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे साडे तीन वाजता ते पृथ्वीवर पोहोचेल.

सुरुवातीला दोघेही बुधवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून निघणार होते. मात्र ‘स्पेस एक्स’बरोबर चर्चा केल्यानंतर आणि फ्लोरिडामधील हवामानाचा अंदाज घेऊन आज, मंगळवारीच दोघांच्या परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, ‘नासा’ने जाहीर केले.

सुनिता विलियम्स आणि बुच विल्मर जून महिन्यापासून म्हणजेच तब्बल नऊ महिने अंतराळात अडकले होते. नासा आणि आणि स्पेसएक्स कडून प्रयत्न करत त्यांना परत आणले जात आहे. त्यांच्यासोबत निग हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव देखील परत येणार आहेत. नासाने सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी केले आहे. वातावरणातील बदलामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. साधारणपणे हा प्रवास १७ तासांचा असेल.

  • आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र ते पृथ्वीचा प्रवास असा असेल…
  • रविवारी ‘आयएसएस’मध्ये पोहोचलेल्या १०व्या चमूकडे सुनीता आणि बुच यांच्या नवव्या चमूने सूत्रे सोपविल्यानंतर दोघांच्याही परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली.
  • ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’च्या तंत्रज्ञांची बैठक होऊन फ्लोरिडामधील वातावरणाचा अंदाज घेण्यात आल्यानंतर परतीचा प्रवास एक दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता ‘स्पेस एक्स ड्रॅगन क्रू’ या अंतराळयानाचे ‘हॅच’ बंद करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या क्षणापासून ‘नासा’च्या संकेतस्थळावर परतीच्या प्रवासाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
  • ‘नासा’चे अंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’चे अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील सुनीता आणि बुच यांच्यासह परतीचा प्रवास करणार आहेत.
  • वातावरणाने साथ दिल्यास उद्या, बुधवारी पहाटे ३.२७ वाजता सुनीता आणि बुच यांना घेऊन येणारी ‘स्पेस कॅप्सूल’ फ्लोरिडा किनाऱ्यापासून जवळ समुद्रात उतरेल.