अथणी / वार्ताहर
अथणी सासू – सासऱ्याने सुनेचा खून करून अपघातात तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुले होत नसल्याच्या कारणावरून सासू – सासऱ्याने सुनेला ठार केल्यानंतर खून पचविण्यासाठी ती दुचाकीवरून पडून मरण पावल्याची बनाव रचण्यात आल्याची फिर्याद पोलिसात करण्यात आली आहे. अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी मलाबाद रस्त्यावर ही घटना घडली असून रेणुका संजय होनकांडे (वय ३२) असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे.
मुले होत नसल्याने रेणुका हिला सासरे कामण्णा होनकांडे आणि सासू जयश्री होनकांडे यांनी दुचाकीवरून निर्जनस्थळी नेले आणि तिथे दगडाने घाव घालून तिचा खून केला. यानंतर हा अपघात भासविण्यासाठी तिचा मृतदेह दुचाकीच्या बाजूला ठेवून ती दुचाकीवरून पडून मेली असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मयत रेणुकेच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकरणी सासू-सासऱ्याविरुद्ध अथणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे.