सुळगा (हिं.) : येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने उत्साही वातावरणात पार पडला. येथील वेंगुर्ला रोड तसेच मारुती गल्लीतील हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शनिवार दि. १२ रोजी पहाटे हनुमान मूर्तीला विधीवत अभिषेक घालण्यात येऊन पूजन करण्यात आले. सकाळी ६ वा. हनुमान जन्मोत्सवानिमित्त येथील महिलांनी पाळणागीत गायिले. त्यानंतर दिवसभर भजन कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यामध्ये पुरुष – महिला भक्तांनी हरिपाठ व भजन सादर करून हनुमान जन्मोत्सव भक्तिमय आणि उत्साहाने साजरा केला. हनुमान जयंती आणि शनिवार असा दुहेरी योग आल्याने भक्तांनी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांना संपूर्ण दिवसभर तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.

  • मारुती गल्ली येथे सायंकाळी महाप्रसाद :

हनुमान जयंतीनिमित्त मारूती गल्ली येथे, सायंकाळी ७.३० पासून गावातील सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मारुती गल्ली येथील हनुमान सेवक मंडळाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे नियोजन केले होते. शेकडो भक्तांनी याचा लाभ घेतला.