सुळगा (हिं.) : येथे आज सोमवार दि. १२ मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर चित्ररथ मिरवणूक डॉल्बीमुक्त करून पारंपरिक वाद्ये, ऐतिहासिक सजीव देखावे सादर करून बेळगाव तालुक्यात एक वेगळाच पायंडा पाडण्याचा संकल्प गावातील सर्व युवक मंडळे आणि पंच कमिटी व ग्रामस्थांनी केला आहे. नुकतीच श्री ब्रह्मलिंग मंदिरमध्ये बाळू मोनाप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंच कमिटी, सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक झाली. या बैठकीत शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या मिरवणुकीमध्ये डॉल्बी न लावता फक्त पारंपरिक वाद्ये, ऐतिहासिक सजीव देखावे सादर करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या उत्कृष्ट देखाव्यांना देवस्की पंच कमिटीकडून पारितोषिक दिले जाणार आहे, असे सांगितले.