बेळगाव / प्रतिनिधी

महांतेशनगर बेळगाव येथे मुलाकडे राहण्यासाठी आलेल्या आणि गोंधळल्याने अस्वस्थ झालेल्या वृद्ध महिलेला सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशिलकर यांनी मदत केली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, शांता शिवयोगी मुक्कण्णावर (वय ८०) रा. कुदनूर (कोवाड) ता.चंदगड ; जि .कोल्हापूर ही वृद्ध महिला बेळगाव महांतेशनगर येथे मुलाकडे राहण्यासाठी आली होती. याच दरम्यान मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता, तर इतर कुटुंबीय घरात कामामध्ये व्यस्त होते. यावेळी मुलाच्या कुटुंबियांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्या वृद्धेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. मुलाला भेटण्यासाठी आपण चुकीच्या ठिकाणी आल्याचे गृहीत धरून सदर महिला तेथून बाहेर पडली.

त्या वृद्धेची दयनीय अवस्था पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशिलकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सौरभ काशिलकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्या महिलेची विचारपूस केली. मात्र प्रचंड गोंधळल्याने ती मानसिक दृष्ट्या अस्वस्थ झाली होती. यानंतर सौरभ यांनी तात्काळ त्या महिलेसह माळमारुती पोलीस स्थानक गाठले. येथे पोलिसांनी त्या महिलेची रीतसर चौकशी केली. दरम्यान तासाभरानंतर त्या वृद्ध महिलेचे कुटुंबिय पोलीस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आले होते.

तेव्हा पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशिलकर यांच्यासह उपस्थित असलेल्या वृद्धेची ओळख पटवून तिला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. यावेळी वृद्ध महिलेच्या कुटुंबियांनी सामाजिक कार्यकर्ते सौरभ काशिलकर यांचे आभार मानले.