पणजी / प्रतिनिधी

गोवा शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रेत भक्तांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला तर सुमारे ७० भाविक जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे ३ वा. दरम्यान ही घटना घडली. सुर्या नयेकर (सत्तरी), आदित्य कवठणकर (वय १७) व तनुजा कवठणकर (वय ५२, अवचीतवाडो थिवी), यशवंत केरकर (वय ४०, माडेल थिवी),  प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) आणि सागर नंदरगे (३०, माठवाडा पिळगाव) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, होमकुंडाकडे जाताना सुरुवातीला दोघेजण जमिनीवर पडले. त्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली. यावेळी रस्त्यानजीक असलेल्या दुकानांवर धोंड भाविक कोसळले. दुकानांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे काहींना विजेचा धक्का लागण्याची शक्यता आहे.

चेंगराचेंगरीनंतर साखळी, डिचोली, म्हापसा आणि बांबोळी येथील सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी सुमारे १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बिचोली आरोग्य केंद्राला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तर मंत्री निळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेठ यांनीही म्हापसा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.