• विजयपूर जिल्ह्यातील मनगोळी येथील दुर्घटना
  • कार कंटेनर खासगी बस मध्ये तिहेरी अपघात : सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले

विजयपूर / दिपक शिंत्रे

कार, कंटेनर व खासगी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगोळी शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग ५० वर बुधवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच तर खासगी बसचालकाचा उपचारासाठी हलविताना मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांनी वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

कार मधील पी. भास्कर (वय ३६), त्यांच्या पत्नी पवित्रा (वय ३४), मुलगा अभिराम (वय १४) आणि मुलगी ज्योत्स्ना (वय १२, सर्व रा. तेलंगणा) कारचालक विकास मुकणी (वय ३० रा. होर्ती) व बसचालक बसवराज लमाणी (वय ४८) कशी मृतांची नावे आहेत तर अपघातात कारमधील दहा वर्षांचा मुलगा प्रवीणतेज, बसमधील प्रवासी बाळासाहेब मुरलीधर कणसे (वय ३९,रा. पुणे) गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने बसमधील अन्य प्रवासी सुखरूप आहेत.

महिंद्रा बोलेरो कार ही विजापूरकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या खासगी बसला धडकली. या धडकेत बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर बस आढळली. कारची जोराची धडक बसला बसल्याने कार मधील चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. कार मधील मृतामध्ये आई-वडिलांसह मुलगा आणि मुलगीचाही समावेश आहे.

तर बसचालक बसवराज लमाणी गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. बसमधील अन्य प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कार मधील प. भास्कर मुरुडेश्वर आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देऊन इंडी तालुक्यातील वरती येथे परतत होते. यावेळी अपघातात त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. पी. भास्कर हे इंडी तालुक्यातील होर्ती गावातील कॅनरा बँकेत व्यवस्थापकपदी कार्यरत होते. तर अपघातग्रस्त बस मुंबईहून बळळारीच्या दिशेने जात होती.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ, ग्रामीणचे डीएसपी टी. सुल्फी, ग्रामीणचे सीपीआय रमेश आवजी आणि इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन मदत कार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. या घटनेची नोंद मनगोळी पोलीस स्थानकात झाली आहे.

  • मंत्री पाटील यांच्याकडून जखमींची विचारपूस

अपघातात कारमध्ये जखमी झालेल्या मुलास नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीची साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी विचारपूस केली तसेच त्याच्यावर योग्य उपचार करावेत तसेच गरज भासल्यास सदर मुलाला अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.