• सीईएन पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील सीईएन पोलिसांनी सिंधी कॉलनी परिसरात क्रिकेट सट्टेबाजी अड्ड्यावर छापा घालून एका सट्टेबाजाला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. उद्धव जय रामदास रोचलानी (वय ६१ रा. सिंधी कॉलनी, बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजाचे नाव आहे. तर त्यांच्या मुलगा करण उद्धव रोचलानी हा फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

याबाबत पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामा दरम्यान दोघे बाप – लेक बेटिंग चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीईएन पोलीस निरीक्षक बी.आर.गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सिंधी कॉलनी हिंडलगा येथे या सट्टेबाजी अड्ड्यावर छापा घातला. या कारवाईत त्यांच्याकडून एक अँड्रॉइड फोन, १२ आयफोन, १३ बेसिक हँडसेट, २ लाख रू. किंमतीचे स्मार्ट टीव्ही जप्त करण्यात आले आहेत.