बेळगाव / प्रतिनिधी

शिंदोळी (ता. जि. बेळगाव) गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यांच्या संयुक्त यात्रोत्सवाला आज मंगळवारपासून अपूर्व उत्साहात भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे. शिंदोळी गावातील गुरुजन, समस्त नागरिक आणि यात्रा कमिटीतर्फे आयोजीत सदर संयुक्त यात्रा उत्सवाची सुरुवात आज सकाळी ६ वाजता अक्षता रोपण अर्थात देवीच्या विवाहाने झाली. याप्रसंगी गावातील पंच कमिटी आणि यात्रोत्सव कमिटीचे सदस्य अशी ठराविक मंडळी उपस्थित होती.

त्यानंतर पुनश्च एकदा सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बडेगोळ्ळ्ळमठाचे प. पू. नागाप्पा महास्वामीजी, शगनमट्टीचे प. पू. रुद्रय्या महास्वामीजी यांच्या सानिध्यात निमंत्रित पाहुणे मंडळी आणि समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत देवीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव आदी मान्यवरांनी शिंदोळी गावाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. आता सायंकाळी देवी मंदिरातून उठून होन्नाट खेळणार असून त्यानंतर रात्री ८ – ८.३० वाजण्याच्या सुमारास ती रथात विराजमान होणार आहे. दिनांक २३ एप्रिल आणि २४ एप्रिल रोजी गावातून श्री महालक्ष्मी देवीची सवाद्य रथ यात्रा काढली जाणार आहे. या कार्यक्रमाला बेळगावच्या कारंजी मठाचे श्री गुरु सिद्धमास्वामीजी तसेच हुक्केरी मठाचे श्री चंद्रशेखर महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत. २४ एप्रिल रोजी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सकाळी नऊ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.