- गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने संपविले जीवन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील शहापूर येथे रविवारी एका रुग्णवाहिका चालकाने पगार न मिळाल्याने कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. ओंकार पवार (वय २५) असे आत्महत्या केलेल्या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवल्याची ठेवल्याची माहिती आहे.
ओंकार हा बेळगाव शहरातील सेंट्रा हॉस्पिटलमध्ये चालक म्हणून काम करत होता. गेल्या चार महिन्यांपासून रुग्णालय प्रशासनाने पगार देण्यास नकार दिल्याने शहापूर येथे भाडोत्री घरात राहणाऱ्या ओंकारने रुग्णालय प्रशासनाविरुद्ध सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी ओंकारचे लग्न झाले असून त्याला एक मूल आहे. बेळगाव बिम्स रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे.
दरम्यान आत्महत्येची माहिती असूनही रुग्णालय प्रशासनाने घटनास्थळी भेट न दिल्याबद्दल कुटुंब आणि चालक संघटनेच्या नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.