बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावच्या उपनगरी भागातील शहापूर, वडगाव, जुने बेळगावसह विविध ठिकाणी बुधवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली. बेळगाव शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आज पाचव्या दिवशी बेळगाव शहराच्या दक्षिण भागात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. होळीच्या दहनानंतर पाचव्या दिवशी झालेल्या या रंगोत्सवात आबालवृद्धांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
सकाळपासूनच विविध गल्ल्यांमध्ये रंग उधळण्यास प्रारंभ झाला. मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देत महिलांनीही रंगोत्सवाचा आनंद लुटला. शहरात विशेषत: वडगाव, शहापूर भागात संस्थान कालीन परंपरेप्रमाणे आज रंगपंचमी साजरी करण्यात आली. तरुणाई आणि बालचमू डॉल्बीच्या तालावर थिरकत होते. अनेक ठिकाणी रंगपंचमीसाठी खास स्प्रिंकलर्स, वॉटर शॉवर लावण्यात आले होते. शहापूर कचेरी गल्ली, नार्वेकर गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, नवी गल्ली, गणपत गल्ली येथे रंगपंचमीचा उत्साह दिसून आला.

आयुष्यातील दुःख विसरून सर्वजण सप्तरंगाप्रमाणे आपले आयुष्य रंगीत बनवताना दिसत होते. जल्लोषी वातावरणात एकमेकांना भेटून गल्लीमध्ये कोपऱ्यावर, चौकात रंग उधळण्यात आले.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती नगरसेवक रवी साळुंके म्हणाले , इतर वेळेप्रमाणे होळी सण शांततेत व आनंदात साजरा होत आहे. मुस्लिम धर्माचा रमजान महिना सुरू असून, विद्यार्थ्यांच्या परीक्षाही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर रंगपंचमी शांततेत साजरी होत असल्याचे त्यांनी सांगितले.