बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत असलेल्या दाहिनी वरील निवारा शेड काल दुपारी झाड पडल्यामुळे कोसळला होता. या घटनेसंदर्भात महापालिकेने तात्काळ कारवाई करताना कोसळलेल्या निवाऱ्या शेजारील धोकादायक झाडे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. निवाऱ्या आसपासची धोकादायक झाडे हटविल्यानंतर कोसळलेला निवारा काढण्याचे काम सुरू होणार आहे.

काल घडलेल्या घटनेनंतर महापौर मंगेश पवार यांनी तात्काळ शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन तेथील कोसळलेल्या निवारा शेडची पाहणी केली होती. त्याचबरोबर झाडे आणि कोसळलेला निवारा हटविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार झाडे आणि कोसळलेला निवारा काढण्याचे काम सुरू झाले आहे.

मात्र या ठिकाणी लवकरात लवकर नवीन निवारा उभारणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना निवाऱ्याची नितांत गरज आहे. कोसळलेल्या निवाऱ्याच्या जागी नवीन निवारा उभा राहिला नाही तर नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. याची महानगरपालिकेने वेळीच दखल घेणे ही आवश्यक आहे.