- म. ए. समितीतर्फे कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
बेळगाव / प्रतिनिधी
सन १९८६ साली पुकारण्यात आलेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात हौताम्य पत्करलेल्या वीर हुतात्म्यांना रविवारी अभिवादन करण्यात आले. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकासमोर उपस्थित राहून कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांचे स्मरण केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आगामी काळात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.

प्रारंभी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील यांच्याहस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तर मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी उपस्थितांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, बेळगाव – कारवार – निपाणी – बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या.

यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण – पाटील, तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम.चौगुले, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, आर. आय. पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मदन बामणे, लक्ष्मण होनगेकर, ॲड. सुधीर चव्हाण, नगरसेवक रवी साळुंखे, ॲड. महेश बिर्जे, गणेश दड्डीकर, डी. बी. पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, सुनील बाळेकुंद्री, ॲड. अमर येळ्ळूरकर, शेखर पाटील, येळ्ळूर ग्रा. पं. माजी अध्यक्ष सतीश पाटील, मोतेश बार्देसकर, धनंजय पाटील, श्रीकांत कदम, मनोहर हुंदरे, बाबू कोले, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, कमल मन्नोळकर आदींनी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार व फुले वाहून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, १ जून १९८६ खाली झालेल्या कन्नडसक्ती आंदोलनात ९ हुतात्मे झाले. यानंतर आज ३९ वर्षांमध्ये कन्नडसक्ती दूर न होता कर्नाटक सरकार अधिक तीव्रतेने त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही मराठी भाषिक आहोत, जे पूर्वी मुंबई प्रांतात होतो. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबई प्रांतात असलेला चंदगड तालुका महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला. तर बेळगाव, खानापूर व निपाणी या तीन तालुक्यांना कर्नाटकात डांबण्यात आले, हे आपले दुर्दैव आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने गेली ७० वर्षे लढत आहोत, पण ज्या महाराष्ट्राच्या आधारावर हा लढा सुरू आहे ते खरचं आमच्या पाठीशी आहे का? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळेच गेले अनेक हुतात्मे होऊन सुद्धा हा प्रश्न सुटला नाही असे त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नाच्या सोडवुकीसाठी प्रयत्नशील आहे, पण त्यासाठी योग्य पाठपुरावा होत नसल्याचे दिसून येत आहे, हीच खंत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. यापुढे महाराष्ट्र सरकार पाठीशी असो किंवा नसो आपण सीमाप्रश्न सोडवण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, त्यादृष्टीने कर्नाटक व केंद्र सरकारच्या विरोधातील लढा एकजुटीने लढवला पाहिजे असे ते म्हणाले.
खरंतर २०१४ पर्यंत या खटल्याचे काम व्यवस्थित चालले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने साक्षी पुरावे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता गेल्या वीस वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकदाही पंतप्रधानांकडे गेलेले नाही, हे आमचे दुर्दैव आहे. तेव्हा कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या विरोधात लढण्याबरोबर आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सुद्धा लढावे लागणारं का अशा प्रकारची भावना निर्माण झाली आहे. तेव्हा ही भावना मोडून काढायची असेल तर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशाने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावरील लढाईसाठी शक्ती आणि ताकद दाखविणे गरजेचे आहे आणि ते आम्ही पुढील काळात घडवूया, तेव्हाच या हुतात्म्यांना आदरांजली व्यक्त केल्यासारखे होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी समयोचित विचार मांडताना, सीमाप्रश्न सोडवणे हे सर्व मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे. सीमाप्रश्नाची सोडवणुक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे , तेव्हा या लढ्यासाठी सर्वांनी एकीची वज्रमूठ दाखवण्याची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजीत – चव्हाण पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, खानापूर तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस तथा माजी महापौर मालोजी अष्टेकर, तालुका समितीचे उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त करून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार सीमाबांधवांच्या हक्कासाठीची लढाई सुरू ठेवण्याची शपथ घेतली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती, महिला आघाडी, युवा समितीचे पदाधिकारी, समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते.