• वैजनाथ डोंगर परिसरात ट्रॉली उलथवली ; बैलगाडी भिरकावली
  • वाहनावरील हल्ल्यांचे सत्र सुरुच

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या महिन्यापासून बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीकडून वाहनावरील हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी (दि. २१) मध्यरात्री त्याने अतिवाड फाट्याजवळील बैजनाथ डोंगर परिसर शिवारातील ट्रॉली उलथवून टाकली. तर बैलगाडीची मोडतोड करुन भिरकावून दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथून सदर हत्ती महिन्यापूर्वी बेळगावच्या सीमेवर आला आहे.

बुधवारी रात्री सीमेवरील बुक्कीहाळ खुर्द शिवारात त्याने मोठा धुडगूस घातला. या ठिकाणी बारदेसकर नावाच्या शेतात रखवालीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिवाजी बिर्जे यांची ट्रॉली पार्क केली होती. सदर ट्रॉली हत्तीने उलथवून टाकली. रात्री पिकांचे गव्यांपासून रक्षण करण्यासाठी जाणारे शेतकरी या ट्रॉलीमध्ये झोपत होते. मात्र पावसामुळे ते बुधवारी रात्री ते पिकांच्या रक्षणासाठी न गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एवढ्यावरच न थांबता जवळच असलेली गुंडू बिर्जे यांची बैलगाडी भिरकावून दिली. त्यानंतर त्याने शेजारील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. केळीची अनेक झाडे टाकली आहेत. घटनास्थळी चंदगडचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे. नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई तातडीने देण्यासाठी कार्यवाही सुरु केल्याचे आवळे यांनी सांगितले.

  • पावसामुळे बचावले

हत्तीने उलथवून टाकलेल्या ट्रॉलीत रोज रात्री रखवालीसाठी बुकिहाळमधील शिवाजी बिर्जे, यश बिर्जे, आदित्य बिर्जे, सोमनाथ दळवी, गुंडू बिर्जे, ओमकार अमरोळकर, परशराम बिर्जे, रोशन बिर्जे आदी शेतकरी झोपायचे. रात्री गव्यांना हुसकावून लावायचे व ट्रॉलीत झोपायचे, असे त्यांचा रात्रक्रम होता. मात्र, बुधवारी रात्री पावसाने जोर केल्याने सदर शेतकरी पीक रखवालीसाठी गेले नाहीत. त्यामुळे, त्यांचा जीव बचावला.