• परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी
  • जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी

सावगांव (ता.बेळगाव) येथील शेत जमिनी आणि डॅम परिसराचा गैरवापर केला जात असून या ठिकाणी केल्या जाणाऱ्या अवैध तसेच अनैतिक प्रकारांना तात्काळ आळा घालण्यात यावा, अशी मागणी संतप्त समस्त सावगांववासियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सावगांव ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील आणि गावातील प्रमुख नागरिकांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना  सादर करण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बेनकनहळ्ळी, सावगांव ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील म्हणाले, सावगांव परिसरातील अंगडी कॉलेजनजीक शेतात अनैतिक कृत्ये सुरू आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी येथे मद्यपान, धूम्रपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी येतात. तसेच मद्यपान केल्यानंतर बाटल्या तिथेच टाकल्या जातात, तसेच सदर विद्यार्थांकडून नशेत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते. या प्रकारामुळे शेतात कामाला जाणारे शेतकरी व महिलांनाही येथून ये -जा करणे कठीण झाले आहे. येथील काही हॉटेल्स रात्रभर सुरू असतात, संबंधित हॉटेल्स सुरू ठेवण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करून द्यावी. ग्रामपंचायतीने यापूर्वीच नोटीस बजावली आहे. पोलीस विभागानेही याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

तर ग्रामस्थ विठ्ठल कांबळे यांनी यापूर्वीही विद्यार्थ्यांकडून याठिकाणी अनेक गैरप्रकार घडले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी गावातील तरुणांना तुरुंगात डांबले, त्यांची तात्काळ सुटका करून अनैतिक कृत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच सावगाव गावाबाहेरून आलेले तरुण – तरुणी पार्टी करणे, दारू पिणे, धुम्रपान व इतर गैरकृत्ये करत असल्याने येथील महिलांना शेतात जाणे असुरक्षित वाटत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती, त्याला रोखण्यासाठी गेलेल्या गावातील तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी सावगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.