- वीजपुरवठा खंडित करताच व्यापाऱ्यांचा विरोध मावळला
सौंदत्ती / वार्ताहर
अतिक्रमण हटवण्यासाठी सौंदत्ती डोंगरावरील ८० टक्के दुकानांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी अतिक्रमण हटवण्यास स्वतःहून पुढाकार घेतला आहे.
सौंदत्ती डोंगरावरील विकास कामांना अडथळा ठरत असलेली दुकाने व इतर अडथळे हटविण्यासाठी गुरुवारपासून अतिक्रमण हटविण्याचे काम मंदिर प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले होते. मात्र अतिक्रमण हटवण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना व व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाने मंदिर प्रशासनाच्या कार्यालया समोर आंदोलन केले होते. परिणामी काहीवेळ डोंगरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याची मोहीम थांबविण्यात आली होती.
त्यानंतर मंदिर प्रशासनाच्यावतीने तहसीलदार पोलीस अधिकारी व व्यापाऱ्यांसमोर बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर काल शनिवारपासून अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अनेक दुकानांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यासाठी सुरुवात केली. साहित्य हटविण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी देण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी वर्गाने स्वतःहून पुढाकार घेत साहित्य हटविण्यासाठी सुरवात केल्यामुळे डोंगरावरील अतिक्रमण हटविण्यास होणारा विरोध कमी झाल्याचे दिसून येत आहे.
डोंगरावरील अतिक्रमण हटविण्यात सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टपातील विकास कामांना सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.डोंगरावरील दुकानांच्या माध्यमातून संसाराचा गाडा चालवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी विकास कामे हाती घेतल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी दुकाने सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच त्या ठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव करणाऱ्या लमाणु समाजाला ही त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.