कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, बेळगाव आणि कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या सासनकाठ्यांनी जोतिबा मंदिर परिसरात चार दिवस भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. शुक्रवारी यात्रेसाठी डोंगरावर येणार्या सासनकाठ्या व भाविक यांना मानाचा विडा देऊन स्वागत करण्यात आले. मुख्य यात्रेत सासनकाठ्यांची मिरवणूक काढली जाते. हलगीच्या ठेक्यावर, ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात सासनकाठी मिरवणुकीत नाचवली जाते. हा सगळा माहोल लाखो भाविकांनी ‘याची देही, याची देही डोळा’ अनुभवला.
दख्खनचा राजा जोतिबाचे यात्रेतील राजेशाही रूप डोळ्यात साठवून रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी सासनकाठीसह डोंगर उतरण्यास सुरुवात केली तर काही भाविक शनिवारी रात्रीच कोल्हापुरात घाटावर मुक्कामासाठी आले होते. यात्रेनंतर गावी परत जाणार्या भाविकांना अनेक सामाजिक संस्था व्यक्ती तसेच तरुण मंडळे यांच्या वतीने मोफत अन्नछत्र तसेच ताक वाटप व प्रसाद वाटप करण्यात आले.