• फक्त निष्पाप हिंदूंना त्रास देऊ नका ; दोन्ही समुदायातील लोकांची चौकशी करा
  • हिंदूंना शस्त्रे उचलून लढायला लावू नका
  • माजी आमदार संजय पाटील यांचा पोलीस प्रशासनाला इशारा

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावी तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली निरपराध हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप करत आज बेळगाव येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे धर्मग्रंथ जाळण्याच्या घटनेची योग्य चौकशी करण्याऐवजी निष्पाप हिंदू तरुणांना अटक करून त्यांचा छळ करण्याच्या पोलिसांच्या धोरणाचा निषेध करून या प्रकरणी पारदर्शक चौकशीची मागणी करत, संतीबस्तवाड येथील ग्रामस्थांनी आज विविध हिंदू संघटनांच्या सहकार्याने बेळगाव येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तीव्र आंदोलन केले.

यावेळी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, बेळगावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहेत. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ जाळणे निषेधार्ह आहे. पोलिसांनी योग्य तपास करावा. त्याशिवाय कुणाच्या दबावाला बळी पडून केवळ हिंदू तरुणांना अटक करून त्रास देणे योग्य नाही. हिंदू बांगड्या घालत नाहीत. पोलीस खात्याने आपला सन्मान गमावू नये. हिंदूंना शस्त्रे उचलून लढण्यासाठी चिथावणी देऊ नये, असे ते म्हणाले.

तर संतीबस्तवाड गावातील वकील प्रसाद म्हणाले, मशिदीच्या चाव्या आणि धर्मग्रंथ कुठे आहेत? हे हिंदूंना कसे कळेल? ग्रामपंचायत किंवा पोलीस विभागाच्या लक्षात न आणता सीसीटीव्ही कसे हटविले गेले ? मौलाना गावी गेले असताना ही घटना कशी घडली? केवळ एका बाजूने तपास करणे योग्य नाही. निरपराध हिंदू तरुणांना अटक करून ४ ते ५ दिवस पोलिस स्थानकात ठेवणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

धनंजय जाधव बोलताना म्हणाले, पोलिसांच्या भीतीमुळे निष्पाप हिंदू तरुणांना गाव सोडावे लागत आहे. हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त होत असून हिंदूंना त्रास दिल्यास, संपूर्ण जिल्ह्यातून ‘चलो संतीबस्तवाड’ आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी हजारो हिंदू कार्यकर्ते आणि संतीबस्तवाडचे ग्रामस्थ उपस्थित होते.