बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावात धर्मग्रंथ जाळल्याच्या प्रकरणी सीआयडी अधिकाऱ्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील धर्मग्रंथ जाळल्याचे प्रकरण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहे. कालच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आल्याची माहिती दिली होती. आज सीआयडी डीवायएसपी सुलेमान ताशीलदार यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने हा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडून तपास अहवालाची माहिती गोळा केली जात आहे.
सीआयडी अधिकाऱ्यांनी धर्मग्रंथ चोरून नेलेल्या मशीद परिसर आणि धर्मग्रंथ जाळलेल्या घटनास्थळी प्राथमिक तपास सुरू केला आहे. सीआयडी अधिकाऱ्यांच्या पथकाला बेळगाव पोलिसांनी सहकार्य केले असून, उद्याही सीआयडी अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे.