बेळगाव / प्रतिनिधी

संतीबस्तवाड गावातील मशिदीत इस्लामी पवित्र धर्मग्रंथांच्या विटंबनेचे संवेदनशील प्रकरण विशेष आणि अधिक तपशीलवार तपासासाठी अधिकृतपणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले असल्याची माहिती नूतन पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मात्र सोमवारी पुन्हा एकदा मुस्लिम धर्म बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला तसेच सदर प्रकरणाबाबत गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणा देऊन कारवाईचा आग्रह करीत धर्म बांधव आक्रमक झाले होते.

पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार संतीबस्तवाड गावातील नव्याने बांधलेल्या मशिदीच्या तळघरातील प्रार्थनागृहात गेल्या १२ मे रोजी सकाळी अज्ञात समाजकंटक घुसले. त्यांनी कुराणाच्या दोन प्रती आणि अन्य चार पवित्र ग्रंथ लंपास केले. त्यांनी ते मशिदीच्या पश्चिमेला असलेल्या गुंडोजी नावाच्या व्यक्तीच्या जमिनीत फेकून त्यावर चप्पल टाकून पवित्र ग्रंथ जाळण्याद्वारे त्यांची विटंबना केली. मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याचा कयास आहे. प्रारंभी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तपास हाती घेतला तत्कालीन पोलिस आयुक्त ईडा मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली. तथापि अलिकडेच झालेल्या मार्टिन यांच्या बदलीनंतर नवनिर्वाचित पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यानंतर संवेदनशील स्वरूपामुळे आणि निर्णायक प्रगतीअभावी तपास आता अधिकृतपणे सीआयडीकडे सोपवण्यात आला असल्याचे जाहीर केले. सीआयडीचे डीएसपी सुलेमान तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.