- पोलीस निरीक्षक शिवशरण आवजी यांच्या निलंबनाची मागणी
संकेश्वर / वार्ताहर
दलितविरोधी धोरण अवलंबत असल्याचा आरोप करत संकेश्वर येथील पोलीस निरीक्षक शिवशरण आवजी यांना निलंबित करावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो दलितांनी मंगळवारी पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी शेकडो दलित नेते व युवकांनी आंबेडकर पार्क येथे एकत्रित येत चन्नम्मा सर्कल येथील नगरपालिकेतून पोलीस स्थानकापर्यंत मोर्चा काढला. यानंतर पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर सुमारे तासभर ठिय्या मारून रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनावेळी आवजी हटाओ संकेश्वर बचाओच्या घोषणा देण्यात आल्या. बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख घटनास्थळी पोहोचेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काही दलित नेत्यांनी, संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण आवजी हे दलितविरोधी धोरण अवलंबून दलितांकडे तुच्छतेने पाहत असल्याचे सांगितले. वाद झाल्यास मिटविण्यासाठी ते लाच मागतात, अशी तक्रारही त्यांनी केली.
दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यामार्फत पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीसप्रमुखांना, संकेश्वरचे पोलीस निरीक्षक शिवशरण आवजी यांना निलंबित करावे किंवा त्यांची बदली करावी या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन स्वीकारून पोलीस अधीक्षक बसरगी यांनी आंदोलकांना ही विनंती त्यांच्या वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी यमकनमर्डी सीपीआय जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- आंदोलनाला वकिलांचा पाठिंबा :
संकेश्वर येथील काही वकिलांनीही शिवशरण आवजी यांच्या दलितविरोधी धोरणाविरोधात दलितांनी केलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला.