- पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी घेतले दत्तक
बेळगाव / प्रतिनिधी
विविध सामाजिक उपक्रमांतून सतत मदतीचा हात पुढे करणाऱ्या संजीवनी फाउंडेशनच्या वतीने संजीवनी विद्याआधार या माध्यमातून निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी या गावची विद्यार्थिनी अश्विनी पुजारी हिला तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दत्तक घेण्यात आले आहे.
अश्विनीने दहावीच्या परीक्षेत ६२० गुण मिळवून आपले उज्ज्वल भविष्य दाखवून दिले आहे. तिला आयआयटीमधून अभियंता होण्याचे स्वप्न आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या पुढील शिक्षणात अडचण येत असल्याचे समजताच, संजीवनी विद्याआधारने तिला तिचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
त्यानुसार, अश्विनीला मंगळूर येथील अल्वाज प्री युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यात आला व तेथील वार्षिक फी भरण्यात आली असून, वर्षभराचे वसतिगृह आणि खानावळीचा खर्चही संजीवनी फाउंडेशन करणार असल्याचे संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी सांगितले.
आदर्शनगर येथील संजीवनी फाउंडेशनच्या सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात अश्विनी पुजारीचा शाल, गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी लीलावती हिरेमठ यांनी अश्विनीचे कौतुक करताना म्हटले की, “अश्विनीचे नक्षत्र खूप तेजस्वी असते आणि तू तुझ्या भावी आयुष्यात नक्कीच चमकणार असून तुझ्या यशाचे कौतुक करावे तितके कमीच आहे.” असे गौरवोद्गार काढले. संजीवनी विद्याआधारचा आधार घेऊन स्वप्नांना गवसणी घाल आणि भविष्यात तिच्यासारख्या अनेक गरजू विद्यार्थिनींना मदत करत जा असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आली. मिताली कुकडोळकर यांनी पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत केले, तर राधा ताम्हणकर यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली. लीलावती हिरेमठ आणि अश्विनीच्या शिक्षिका मुक्ता मोटराचे यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी जाहीर केले की, अल्वाज कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतरही फाउंडेशन अश्विनीच्या पुढील शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेईल आणि तिच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी, अश्विनी पुजारीने फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि आपले ध्येय साध्य होईपर्यंत थांबणार नसल्याचे सांगितले.
यावेळी अभियंता आर. एम. चौगुले, सामाजिक कार्यकर्ते विकास पवार, येळ्ळूर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पराशराम मोटराचे, संस्थेचे सल्लागार संजय पाटील, डॉ. नविना शेट्टीगार, प्रीती चौगुले, विद्या सरनोबत, डॉ. तेजस्विनी, नई उमंग संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी नेवगीरी तसेच इतर निमंत्रित मान्यवर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्री माळी यांनी केले तर पद्मा औषेकर यांनी आभार मानले.