• सुमारे ७५ लाखांचे नुकसान
  • अग्निशमन दलाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बेकरी मालक नाराज

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील रविवार पेठ कांदा मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास एका नॉव्हेल्टी शॉपला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच सदाशिवनगर येथील विजय बेकरीमध्येही शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले आहे. 

शहरातील सदाशिवनगर सेकंड क्रॉसजनजीक असलेल्या विजय बेकरीत लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. यावेळी आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी विजय बेकरीचे मालक विनोद कदम यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन विनोद कदम यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा विनोद कदम यांनी आपले कर्मचारी आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश मिळवले. मात्र तोपर्यंत या भीषण आगीत सर्व वस्तू जळून भस्मसात झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या या निष्काळजीपणाबद्दल विनोद कदम यांनी नाराजी व्यक्त केली. या अपघातामुळे सुमारे ७२ ते ७५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.