• सुवासिनींनीकडून पारंपारिक पद्धतीने वटवृक्षाचे पूजन
  • बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात वटपौर्णिमेचा उत्साह

बेळगाव / प्रतिनिधी

पतीला दीर्घायुष्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करत, मंगळवारी बेळगाव तालुक्यासह शहर परिसरात वटपौर्णिमेचा सण उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीच्या पूजन सोहळ्यासह सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले. यामुळे वटपौर्णिमेचा सण खऱ्या अर्थाने साजरा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. वटपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने साड्या नेसून, साजश्रुंगार केलेल्या तरुण, प्रौढ अशा सर्व वयोगटातील सुवासिनी महिलांनी ठिकठिकाणी जाऊन वटवृक्षाचे पूजन केले. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी महिला पूजन कार्यात मग्न झाल्याचे दिसून आले.

शहरातील समादेवी मंदिरासमोरील वटवृक्षाच्या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे टिळकवाडी येथील साई मंदिर आणि व्हॅक्सीन डेपो परिसरात देखील महिलावर्गांनी वट पूजन केले. उपनगरी भागात विविध ठिकाणी वटवृक्षाचे पूजन करून सण साजरा करण्यात आला. महिलांनी उपवासाचे आचरण करून व्रत पालन केले.

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान वटपौर्णिमा भक्तीभावाने येथे साजरी करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह आज सकाळी वयोवृद्ध दाम्पत्याचा सोहळा सत्कार सोहळा देखील पार पडला. बेळगाव शहरातील सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर देवस्थान येथे सावित्रीच्या मूर्तीचे पूजन मंदिराच्या परिसरात करण्यात आले.

तत्पूर्वी कपिलेश्वर ट्रस्टच्यावतीने वयोवृद्ध दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. वयोवृद्ध दाम्पत्य गोपाळ कुलकर्णी व सौ. परिमळा गोपाळ कुलकर्णी, चन्नमल्लप्पा फुटाणे व सौ. सुवर्णा चन्नमल्लप्पा फुटाणे यांचा भेट वस्तू देऊन तसेच ओटी भरून सत्कार करण्यात आला. श्रीसालाबाद प्रमाणे मंदिर ट्रस्टच्यावतीने महिलांसाठी अल्पोपहार तसेच दुधाचे वाटप करण्यात आले. 

दरम्यान बेळगाव तालुक्यात विविध ठिकाणी सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. तालुक्यातील सुळगा (हिं.) गावातही वटपौर्णिमेचा उत्साह दिसून आला.

सुवासिनींनी सकाळपासूनच वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी नियोजन केले होते. आंबा, जांभूळ, सफरचंद, केळी, फणस आदी पाच फळे, हळदीकुंकू असलेले तबक घेऊन महिलांनी वडाच्या झाडांपाशी गर्दी  केली होती. 

यानंतर हळदीकुंकू, फळे वाहून सुवासिनींनी मनोभावे वटवृक्षाची पूजा केली. यावेळी सौभाग्याचे लेणे मानले जाणारे हळद – कुंकू लावून वाण देऊन एकमेकींची ओटी भरली. तसेच वडाच्या झाडाला सुती धागा बांधून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. एकंदरीत पती – पत्नीचे नाते दृढ करणारा वटपौर्णिमेचा सण महिलांनी परंपरा जोपासत उत्साहात साजरा केला.