बेळगाव / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच गोकाक रोड रेल्वे स्थानकासह देशातील 103 अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत. यानिमित्त अमृत भारत गोकाक रोड रेल्वे स्थानकाविषयी माहिती
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 16.98 कोटी रुपये खर्चून गोकाक रोड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. प्रवाशांची अधिक सोय होण्यासाठी सदर रेल्वे स्थानकाची नवी जी प्लस वन स्वरूपाची नवीन इमारत 546 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात आली आहे. गोकाक रोड रेल्वे स्थानकाचे 3463 चौरस मीटरचे परिभ्रमण क्षेत्र समर्पित पार्किंग आणि वाहनांच्या सुरळीत हालचाली झोनसह विकसित करण्यात आले आहे. जुन्या संरचनेची जागा नवीन 12 मीटर रुंद फूट-ओव्हर ब्रिजने (एफओबी) घेतली असून ज्यामुळे क्रॉस-प्लॅटफॉर्म प्रवेश सुधारला आहे. अतिरिक्त सुधारणांमध्ये आधुनिक प्लॅटफॉर्म शेल्टर, नूतनीकरण केलेले शौचालये, लिफ्ट, एक प्रशस्त प्रतीक्षालय आणि सुधारित साइनेज, प्रकाशयोजना आणि डिजिटल माहिती प्रणाली यांचा समावेश आहे.
उपरोक्त सुधारणा प्रादेशिक संपर्क (कनेक्टिव्हिटी), पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सज्ज आहेत. मिरज -लोंढा रेल्वे मार्गावर बेळगाव जिल्ह्यात धोरणात्मकदृष्ट्या स्थित गोकाक रोड रेल्वे स्टेशन उत्तर कर्नाटकातील प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याखेरीज ते कृषी आणि औद्योगिक केंद्रांना बेळगाव, हुबळी, पुणे आणि बेंगलोर सारख्या प्रमुख शहरांशी जोडते.