बेळगाव / प्रतिनिधी
अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आपण रहात असलेल्या हॉस्टेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी रामनगर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याचे कुटुंबीय बेळगावात दाखल झाल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.
प्रज्ज्वल अण्णासाहेब कुप्पनट्टी (वय २०) मूळचा राहणार बुवाची सौंदत्ती असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अभियांत्रिकी दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. रामनगर परिसरातील एका हॉस्टेलमध्ये त्याने आश्रय घेतला होता. आपण रहात असलेल्या खोलीत त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोमवारी दुपारी १२ नंतर त्याने आत्महत्या केली आहे. दुपारपासूनच त्याचे काही मित्र खोलीचा दरवाजा ठोठावत होते. त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून सायंकाळी ५ वाजता दरवाजाच्या फटीतून पाहिले असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. सकाळी ११.२६ वाजण्याच्या सुमारास प्रज्ज्वल आपण रहात असलेल्या हॉस्टेलमध्ये येतो. त्यानंतर तो आपल्या खोलीतून बाहेर पडला नाही. बुवाची सौंदत्ती येथील त्याच्या कुटुंबीयांना यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. ते बेळगावात दाखल झाल्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘गुडबाय’ असे लिहिले होते.