• आठ – दहा युवकांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव कोनावाळ गल्ली येथील स्पेअरपार्टच्या दुकानात काम करणाऱ्या एका युवकावर बुधवारी प्राणघातक हल्ला झाला. शिवराज मोरे (वय २५, रा. अनगोळ) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर १० पेक्षा अधिक जणांनी हल्ला केला आहे.

हल्लेखोरांनी शिवराज याला दुकानातून जबरदस्तीने स्कूटीवर बसवून नेले आणि त्यानंतर त्याच्या डोके, हात – पाय आणि पाठीवर दगड व काठ्यांनी मारहाण जबर मारहाण केली. या घटनेत शिवराज गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ बेळगाव बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रामनवमी दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपींनी हा हल्ला करण्याचा कट रचला होता. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात शिवराज याला स्कूटीवरून जबरदस्ती नेत असलेले दृश्य स्पष्टपणे दिसून येते. सध्या रुग्णालयाबाहेर शिवराजचे मित्र व कुटुंबीय मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवराज मोरे यांची आई कमल मोरे यांनी क्षुल्लक कारणावरून मुलाला जबरदस्तीने कामावरून नेऊन मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.