- महाराष्ट्र एकीकरण समितीची मंगेश चिवटे यांच्याकडे मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शुक्रवारी बेळगावला भेट दिली. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत बेळगावमधील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांच्यासोबत म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली.
श्रीनगर येथील आतंकवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मंगेश चिवटे हे बेळगाव मार्गे शुक्रवारी दिल्लीला रवाना झाले. तेथून ते पहलगाम येथे जाऊन जखमींची विचारपूस करणार असल्याने ते बेळगाव विमानतळावर आले होते. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. सीमाभागातील ८६५ गावांना वैद्यकीय सुविधांसाठी अजून काही हॉस्पिटलना पॅनेलवर घेण्याची विनंती चिवटे यांच्याकडे करण्यात आली.
टिळकवाडी येथील दक्षता हॉस्पिटलला भेट देऊन डॉ. पी. बी. लाड यांच्याकडून व तेथील रुग्णांविषयी माहिती त्यांनी घेतली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे आनंद आपटेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत साळुंखे यांसह इतर उपस्थित होते.