- बेळगावात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या निलंबनानंतर सरकारच्या धोरणाचा निषेध करत सोमवारी बेळगाव येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांमधून बोलताना महांतेश राणागट्टीमठ म्हणाले की, राज्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे. कर्नाटकला केंद्रशासित प्रदेश घोषित केले पाहिजे. हे सरकार सरकारी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार आहे. पोलीस अधिकाऱ्यांना अपमानित करून त्यांना निलंबित करत आहे. बेळगाव ग्रामीण सीपीआय मंजुनाथ रजेवर असताना त्यांना निलंबित केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. जर सरकारने त्वरित हा निर्णय बदलला नाही तर तीव्र संघर्षाचा इशारा त्यांनी दिला.
तर महांतेश वकुंद यांनी कर्नाटक सरकार अधिकाऱ्यांना निलंबित करून खटले बंद करत आहे. संतीबस्तवाडमध्येही अनेक दिवसांपासून जातीय तेढ सुरू आहे. त्याची माहिती देण्याऐवजी मुस्लिम समजाने आंदोलन केल्यामुळे रजेवर असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. निलंबनाचा आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर सवदी, रवि यरगट्टीमठ, शिवकुमार शिवपूजीमठ, मल्लिकार्जुन, जी.एस.पाटील. शंकरय्या हिरेमठ, महांतेश वकुंद आदी उपस्थित होते.