• मार्केट पोलिसात एकावर एफआयआर

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या पंधरवड्यातील अप्रिय घटनांच्या मालिकेमुळे बेळगाव पोलिसांनी सोशल मीडियावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी शनिवारी भडकल गल्ली येथील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त ईडा मार्टिन यांनी शुक्रवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर काळ्या यादीतील गुन्हेगारांना तंबी दिली होती. खासकरून या परेडसाठी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्यांना बोलावण्यात आले होते. यापाठोपाठ सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगा, अशी पोस्ट स्वतः पोलीस आयुक्तांनी केली आहे.

भाषा, धर्म व जात आदी विषयांवर भेदभाव निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर करू नयेत. एखादी पोस्ट पाठवण्याआधी त्याच्यामुळे समाजाच्या शांततेला सुरुंग लागणार नाही ना? याचा विचार करावा. नहून अफवा पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

दरम्यान, इन्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या भडकल गल्ली येथील सुजल (वय १९) या तरुणाला मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारतर्फे एफआयआर त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत या तरुणावर एफआयआर दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर पुढील तपास करीत आहेत.