• अवघ्या चोवीस तासात जिल्ह्यातील दुसरी घटना

कुडची / वार्ताहर

कुडची पोलिस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले मूडलगी तालुक्यातील तुक्कानट्टी गावचे रहिवासी यल्लाप्पा भोज (वय ४६) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुडची पोलिस स्थानकात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी , दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, यल्लाप्पा भोज यांची बेळगाव जिल्ह्याच्या कुडची शहरातील चेकपोस्टवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. रविवारी रात्री अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांनी सहकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ महाराष्ट्रातील सांगलीच्या भारती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यल्लाप्पा भोज हे गेल्या नऊ महिन्यांपासून कुडची पोलीस स्थानकात कर्तव्यावर होते.

बेळगाव शहराच्या कॅम्प पोलीस स्थानकातील एका पोलीस हेडकॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ,चोवीस तासात जिल्ह्यातील आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला असल्याची चर्चा होत आहे.