- अमृत भारत योजनेअंतर्गत नूतनीकरणासाठी १६.०६ कोटी रुपये खर्च
बागलकोट / वार्ताहर
बागलकोट रेल्वे स्थानक हे अमृत भारत रेल्वे स्थानक प्रकल्पाअंतर्गत नूतनीकरण केलेल्या कर्नाटकातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बागलकोटसह राज्यातील पाच आधुनिक रेल्वे स्थानकांचे उद्घाटन होणार आहे.
बागलकोट रेल्वे स्टेशन उद्घाटनासाठी सज्ज आहे. बागलकोट येथे होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना सहभागी होणार आहेत. एकूण १६.०६ कोटी रुपये खर्चून बागलकोट रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये महिला, पुरुष आणि अपंगांसाठी स्वतंत्र सुसज्ज शौचालये आहेत. येथे प्रशस्त प्रतीक्षालय आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर स्थानिक संस्कृती आणि वास्तुकला चित्रित केली आहे. येथे एक सौरऊर्जा प्रकल्प आहे, तसेच पावसाचे पाणी साठवण आणि कचरा व्यवस्थापन युनिट आहे.
प्रवाशांच्या सुरळीत वाहतुकीसाठी १२ मीटर रुंद फुटपाथ तयार करण्यात आला आहे. लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा आहे. तिकीट बुकिंग आणि सामान्य तिकीट खरेदीसाठी किमान तीन आणि जास्तीत जास्त पाच काउंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी दुकाने बांधण्यात आली आहेत.