• महापौर मंगेश पवार यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

बेळगाव / प्रतिनिधी

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाले व कालवे गाळावे व स्वच्छ करावेत. शहरातील सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आगामी पावसाळी हंगामाच्या व्यवस्थापनासाठी बेळगाव महापालिकेची आज महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर वाणी विलास जोशी, सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाळी, विरोधी पक्षनेते मुजम्मील डोणी, महापालिका आयुक्त शुभा बी.आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका रेश्मा भैरकदार म्हणाल्या की, गेल्या २ वर्षांपासून बेळगावमधील छत्रपती शिवाजीनगर आणि वीरभद्र नगरमधील गटारांचे पाणी ओव्हरफ्लो होऊन निवासी भागात शिरत आहे आणि यावर उपाय म्हणून पाईप बसवण्याची गरज आहे. महापालिकेकडे निधी असूनही ते त्याचा चांगल्या प्रकारे वापर का करत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही समस्या सोडवण्यात येईल, असे महापौर मंगेश पवार यांनी सांगितले.

नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी आपल्या प्रभागातही गटाराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन सुमारे १५० लोकांच्या घरात शिरत आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. तर नगरसेविका वीणा विजापुरे यांनी आपल्या प्रभागात असलेल्या गणेशनगरातील कामाची निविदा काढण्यात आली असूनही आजपर्यंत काम का हाती घेण्यात आले अशी तक्रार केली. मिलेनियम गार्डन व आरपीडी कॉर्नरजवळील नाल्यांचा प्रश्न, हिंदवडीतील नाल्यांच्या सफाईकडे होत असलेले दुर्लक्ष याबाबत नगरसेवक नितीन जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

नगरसेवक श्रेयस नाकाडी यांनी शाहूनगर येथील रखडलेले गटाराचे काम शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करावे. “साई हॉलजवळ एक गटार होती. आता त्यावर अतिक्रमण झाले आहे आणि ओढा गायब झाला आहे. यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते आणि जनतेला त्रास होतो. त्यांनी सांगितले की, सर्वेक्षण करून नाल्याची स्वच्छता करावी. नामांकित सदस्य मुस्ताक मुल्ला म्हणाले की, निवारा वसाहतीतील लोक टेकडीवर शौचालयाला जात आहेत. येथे अनेक समस्या आहेत आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे आवश्यक आहे.

प्रभाग क्र. ५२ च्या नगरसेविक खुर्शीदा मुल्ला यांनी सांगितले की, आपल्या प्रभागातील चेंबर्स गेल्या दोन वर्षांपासून खराब होत आहेत. तसेच, ड्रेनेज वाहिन्या फुटल्या आहेत. ही समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या. सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी व काम जाणून घेतल्यास सर्व समस्या सुटतील, मात्र ते उपलब्ध नसल्याची आणि वेळेवर उत्तरे देत नसल्याची तक्रार या बैठकीत करण्यात आली.

प्रभाग क्र. १५ च्या नगरसेविका नेत्रावती भागवत यांनी समर्थनगरमधील सांडपाण्याची समस्या सोडवण्याची मागणी केली. तर बसवनकुडचीचे नगरसेवक बसवराज मोदगेकर म्हणाले की, अडथळ्यांमुळे पावसाचे पाणी मंदिरांसह घरांमध्ये पाणी शिरत आहे आणि त्यासाठी एक कच्चा कालवा बांधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाळी यांनी नगरसेवकांना मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य वापर आणि प्राधान्यक्रम याविषयी मार्गदर्शन केले.

नगरसेवक शंकर पाटील म्हणाले की, रामदेव गल्ली आणि किर्लोस्कर रोड येथे नाल्याच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली आहे आणि हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. सरदार मैदान येथील रस्त्यावर ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून १५ मीटरची गटार बांधावी, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुभाषनगरचे नगरसेवक शाहिद खान पठाण यांनी, कोल्हापूर सर्कल येथील मुख्य रस्त्यावरील सीएनजी पंप कोणत्याही परवानगीशिवाय सुरू झाला आहे. जर काही समस्या उद्भवली तर कोणीही जबाबदार नाही. याविरुद्ध स्वतःहून खटला दाखल करावा का, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला.

प्रभाग क्रमांक १२ मधील संभाजी रोडच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन लोकांचे बळी गेले आहेत. आता या रस्त्याची डागडुजी करून विकास करायचा आहे. असे नगरसेवक मोदीनसाब मतवाले म्हणाले. असदखान सोसायटीच्या चेंबरला तडे गेले आहेत. किल्ला तलावाचे पाणी सोसायटीच्या तळमजल्यावर शिरत असून ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी नगरसेवक मोहम्मद सोहिल संगोळ्ळी यांनी केली.

फूटपाथवर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक रस्ते खराब दुरुस्त करावे तसेच स्मार्ट सिटी कंपनीची विशेष बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक रमेश सोनटक्की म्हणाले की, पूर्वीप्रमाणे बसून चर्चा करण्यापेक्षा महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडवाव्यात.