• संगोळी रायण्णा सर्कल येथील घटना

बेळगाव / प्रतिनिधी

पत्नीला मोबाईलवर पाठवलेल्या व्हॉट्सॲप मॅसेजबद्दल विचारणा केल्यामुळे २० ते २५ तरुणांच्या टोळक्याने एका ऑटो चालकावर लाठ्याकाठ्या व धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. संगोळी रायण्णा सर्कल येथे मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. वसीम बेपारी असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाचे नाव असून उपचारासाठी त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, वीरभद्रेश्वर नगर येथील एका व्यक्तीने वसीमच्या पत्नीला व्हॉट्सॲप मॅसेज पाठवला. वसीम यांनी सदर व्यक्तीला मॅसेज पाठवल्याबद्दल जाब विचारला असता सदर व्यक्तीने २० – २५ तरुणांच्या टोळक्याला घेऊन संगोळी रायण्णा सर्कल जवळ एका हॉटेलमध्ये बसलेल्या वसीमवर चाकू सह प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. आल्यानंतर त्यातील दोन आरोपी मार्केट पोलीस स्थानकात जाऊन बसले, अशी माहिती हल्ला झालेल्या ऑटो चालकाचा भाऊ सलीम बेपारी याने प्रसारमाध्यमांसमोर दिली.