-
कॅप्टन नितीन धोंड यांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
पश्चिम घाटातील वनसंपदा वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत कॅप्टन नितीन धोंड यांनी व्यक्त केले. मंगळवारी बेळगाव येथील मराठा मंगल कार्यालयात आमचे पाणी, आमचा हक्क आंदोलनाच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत बोलताना कॅप्टन धोंड म्हणाले की, मलप्रभा नदी १५०० किलोमीटरपर्यंत वाहते. त्याचप्रमाणे अघनाशिनी, कळसा-बंडुरी आणि म्हादई नद्यांचे पाणी अखंडपणे वाहत जाऊन समुद्राला मिळते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नदीचे पाणी सतत समुद्राला मिळत राहिल्याने कोणतेही नुकसान होत नाही. नदी समुद्राला मिळण्यापूर्वी जंगलातील प्राणी आणि वाळलेल्या झाडांना पाणी पुरवते, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कार्बन डायऑक्साइडची निर्मिती होत आहे. वनक्षेत्रांमध्ये साचलेली शेवाळ नदीच्या पाण्यामुळे कार्बन डायऑक्साइड स्वच्छ करते. म्हादई आणि कळसा- बंडुरी प्रकल्प राबवल्यास हजारो हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान होईल. तसेच उत्तर कर्नाटक पावशाविना वाळवंटात बदलेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणवादी दिलीप कामत यांनी सांगितले की, नद्यांचा प्रवाह अखंडित राहिला पाहिजे. खानापूर वनक्षेत्रात हजारो झाडे तोडून म्हादई प्रकल्प राबवू नये, असे ते म्हणाले. पश्चिम घाट वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संघर्ष करत आहेत. खानापूर वनक्षेत्रात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भाग आहे. २०२४ पर्यंत धारवाड जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची समस्या नाही, तरीही म्हादई प्रकल्प का राबवला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.