• संतप्त पालकांनी शाळेला घेराव घालून व्यक्त केला रोष

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील क्लब रोड येथील वनिता विद्यालय या शाळेत विद्यार्थ्यांची वार्षिक फी कोणतीही पूर्वसूचना न देता वाढवल्यामुळे पालकांनी शाळा प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच दूध, वीज आणि तेलाच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या पालकांनी फी वाढीचा निषेध करत वनिता विद्यालयाला घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.

वनिता विद्यालय शाळा प्रशासनाने वार्षिक फीमध्ये अचानक वाढ केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी वनिता विद्यालयाला घेराव घालून व्यवस्थापना विरोधात जोरदार घोषणा दिल्या. राज्यात आधीच दूध, दही, तेल, बसचे भाडे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशातच काही खासगी शाळांनी वार्षिक फी मध्ये वाढ केल्यामुळे पालकांच्या वेदनेत भर पडली आहे. वनिता विद्यालय प्रशासनाने डोनेशन कमी करणार असल्याचे सांगत वार्षिक फी मध्ये अचानक वाढ केल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दर तीन वर्षांनी फी मध्ये वाढ करण्यात आली. मात्र, गेल्या वेळी वाढलेली फी यंदा पुन्हा वाढवण्यात आली आहे. यामुळे एकाच घरात २ – ३ मुले असणाऱ्यांची अवस्था काय होईल असा मुद्दा पालकांनी मांडला. तसेच गेल्या वेळी देणगी दिलेल्यांच्या रक्कमेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला. दर तीन वर्षांनी फी मध्ये २००० हजारांची वाढ कारण्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. गेल्या वेळी त्यात वाढ करण्यात आली होती आणि यावेळी अचानक ५००० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. डोनेशन कमी करणार असल्याचे सांगत फी वाढविल्याने नाराजी व्यक्त केली.

शाळा व्यवस्थापन अस्तित्वात आहे असे म्हणतात, त्यामुळे व्यवस्थापनाचे पदाधिकारी आल्यावर पालकांना बोलावून विश्वासात का घेत नाही. फी वाढीचा हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र संघर्ष करू, असा इशारा पालकांनी दिला.

यावर शाळेच्या मुख्याध्यापिका जोशीन गुंटी यांनी, पालकांनी फी वाढीला विरोध केला असून ते व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. तसेच फी वाढीबाबत पालकांना आधीच माहिती देण्यात आली होती. सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी नवीन नोंदणीला देणगीतून सूट दिली जाते, फक्त शुल्क आकारले जाते. आमच्या शाळेतील फी इतर शाळांच्या तुलनेत कमी असल्याचे त्या म्हणाल्या.