• लष्कराची शोध मोहीम सुरु

जम्मू काश्मीर (पहलगाम) : जम्मू – काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तिघा संशयितांची नावे आणि स्केच संरक्षण यंत्रणेने जारी केले आहेत. आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी या तिघांची नावे आहेत. तर या दहशतवाद्यांपैकी एकाचा पाठमोरा फोटो समोर आला असून त्याच्या हातात एके – ४७ ही मशीन गन आहे. त्याने कुर्ता – पायजमा परिधान केला आहे. लष्करातील जवान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर तपास यंत्रणा त्याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, काही हल्लेखोरांनी भारतीय लष्करी जवानांसारखा गणवेश परिधान केला होता. हल्ला केल्यानंतर ते काश्मीर खोऱ्यातच लपून बसले असावेत असा प्राथमिक अंदाज असून तपास यंत्रणांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.