- पाकिस्तानला टप्प्यात घेरण्याची तयारी
- सुप्रिया सुळे , श्रीकांत शिंदेंवर महत्त्वाची जबाबदारी
दिल्ली : दहशतवादाला पाठिंबा देऊन पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवत ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून टाकले. यानंतर आता ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगात पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकार सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. यामध्ये प्रत्येक शिष्टमंडळात ५ खासदार असतील. यापैकी एक खासदार गटाचे नेतृत्व करेल. संसदीय कामकाज मंत्रालयाने शनिवारी टीम नेत्यांची नावे जाहीर केली. भाजपचे दोन, काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राष्ट्रवादी (सपा) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांत जाऊन भारताची भूमिका मांडणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ७ सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे देखील सहभागी असणार आहेत. शशी थरूर यांच्यावर मोदी सरकारकडून ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- शिष्टमंडळात सहभागी असलेल्यांची नावे :
- शशी थरूर (काँग्रेस)
- रविशंकर प्रसाद (भाजपा)
- संजय कुमार झा (जेडीयू)
- बैजयंत पांडा (भाजपा)
- कनिमोझी करुणानिधी (डीएमके)
- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी एसपी)
- श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना, शिंदे)
दहशतवादाच्या विरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा हा मजबूत संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी या शिष्टमंडळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार हे शिष्टमंडळ अमेरिका, युनायटेड किंग्डम, दक्षिण आफ्रिका, कतार आणि संयुक्त अरब अमीरात या सारख्या देशांना भेटी देतील. २२ मे नंतर हा परदेश दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.