• तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर गजबजले शाळेचे आवार

बेळगाव / प्रतिनिधी

उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षाला गुरूवारी प्रारंभ झाला. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजले. नवा उत्साह, नव्या आकांक्षा समोर ठेवत विद्यार्थ्यांनी नवीन इयत्तेत प्रवेश केला. प्रदीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर “थोडी खुशी-थोडा गम” असे चित्र पाहायला मिळाले.

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज नवीन शैक्षणिक वर्षासह शाळा सुरू होणार असल्यामुळे कालपासूनच मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे काल सायंकाळी दप्तर, गणवेश वगैरेंची तयारी करून सज्ज असलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या गर्दीमुळे आज गुरुवारी सकाळी शहर उपनगरातील विविध शाळांची आवारे फुलून गेली होती. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक तसेच पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. शाळा परिसरात सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांची ये-जा सुरू होती. पहिलाच दिवस असल्यामुळे काही पालक आपल्या मुलांना सोडण्यासाठी शाळेपर्यंत आल्याचे पहावयास मिळत होते. दप्तर अडकून पालकांसोबत शाळेला जाणारी मुले, शाळांच्या वेळेनुसार सोडायला जाणारे आणि शाळा सुटताच पाल्याला घरी घेऊन येणारे पालक यामुळे शाळा आवारातील रस्त्यांवर पालक व मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.

शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊवाटप करून आकर्षक पद्धतीने शाळा सजवून शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलते करत सुट्टीतील मज्जा, गमती-जमती याबाबत विचारून वातावरण प्रसन्न ठेवले. एकंदरीत दंगा – मज्जा – मस्ती बरोबरच आपला परिचय करून देणे, नवीन मित्रांची ओळख यामध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात निघून गेला.

  • शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न :

दरम्यान, सरकारी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू असून घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने येत्या दि. १ ते दि. १५ जून २०२५ दरम्यान नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर दि. १ ते दि. २० जून दरम्यान मागील वर्षाचा अभ्यासक्रम यासाठी सेतुबंध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.

अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून त्यांच्याकडून पुस्तके व गणवेश पुरवठा, तसेच अन्य तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. मध्यान्ह आहारासाठी स्वयंपाक खोली, स्वयंपाकाची भांडी, तसेच इतर साहित्यांची स्वच्छता करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना देखील शिक्षण विभागाने केली आहे.