- पोलीस आणि जनतेमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक : भूषण बोरसे
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी भूषण गुलाबराव बोरसे यांनी शुक्रवार (दि. ३०) मे रोजी पदभार स्वीकारला. भूषण बोरसे हे २००९ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी मंड्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच बेंगळूरच्या सीआयडी विभागात यशस्वी कारकीर्द बजावली आहे. त्यांनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केला आहे. वाहन चोरी प्रकरणांमध्ये उपयोगी ठरणारे विशेष सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केले आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोरसे यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक सुधारणा आणि पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद सशक्त करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच महिला सुरक्षा, बाल सुरक्षा, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यरत राहणार असून पोलीस विभाग अधिक पारदर्शक, सक्षम आणि जनतेच्या हिताचे असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी बेळगावला येण्याअगोदर मला बेळगाव बद्दल खूप जणांनी चांगले सांगितले आहे. बेळगावचे हवामान खूप चांगले असून बेळगाव मला खूप आवडले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
एकंदरीत त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.